आज दिवसभरात -
- आज राष्ट्रीय स्टार्ट अप दिवस होणार साजरा
स्टार्ट अप्स हा नव्या भारताचा कणा ( Start Up Backbone India ) असणार आहे. तसेच, 16 जानेवारी हा दिवस आता 'राष्ट्रीय स्टार्ट अप दिवस' म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी ( National Start Up Day Narendra Modi ) यांनी केली आहे. त्यानुसार आज देशभरात राष्ट्रीय स्टार्ट अप दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
- रेल्वेचा आज मेगाब्लॉक
मुंबई : मध्य रेल्वेच्या विविध मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे मार्ग तसेच रेल्वेच्या यंत्रणांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (मेन लाइन) तसेच हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक आणि जम्बोब्लॉकमुळे काही गाड्या रद्द होतील तर काही गाड्यांच्या प्रवास मार्गात आणि वेळांमध्ये बदल केले जातील. प्रवाशांना स्टेशनवर रेल्वे नियंत्रण कक्षाकडून होणाऱ्या घोषणा तसेच स्टेशनमास्तर आणि चौकशी कक्ष या ठिकाणी या संदर्भात सविस्तर माहिती मिळू शकणार आहे.
- कोकण रेल्वेवर धावणार विशेष गाडी
कोकण रेल्वेवर आज १६ डब्यांची विशेष रेल्वे धावणार आहे. कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना उसळणारी गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मडगाव-पनवेल स्पेशल गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १६ डब्यांची ही स्पेशल रेल्वे आज १६ जानेवारी रोजी धावणार आहे. ही रेल्वे मडगाव-पनवेल मडगाव येथून सकाळी ११ वाजता सुटून रात्री ९ वाजता पनवेलला पोहचेल. परतीच्या प्रवासात रविवारी रात्री १० वाजता पनवेलहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता मडगावला पोहचेल. या गाडीला करमाळी, थिविम, कुडाळ कणकवली, वैभववाडी, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड,माणगाव, रोहा आदी स्थानकांवर थांबे दिले आहेत.
- उत्तर प्रदेशात आज मोठ्या घडामोडी
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. त्यानुसार आज मोठ्या घडामोडी उत्तर प्रदेशात होणार आहेत. भाजपमधील काही मंत्री आणि आमदार आज समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर काँग्रेसमधील काही उमेदवार हे भाजप अथवा समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.