नवी दिल्ली - शेतकरी आंदोलासंबंधी सोशल मीडियावरून पोस्ट करताना टुलकिटचा (toolkit) वापर झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने तपास सुरू केला आहे. या प्रकरणी सायबर सेलने बंगळुरातील एका २१ वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्तीला अटक केली आहे. दिशा रवी असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्ग हिनेही टुलकिटचा वापर केला होता. त्यामुळे याची जगभर चर्चा झाली होती. तीला दिल्ली न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर चर्चेत आले टुलकिट
ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर चर्चेत आले टुलकिट चर्चेत आले होते. शेतकरी आंदोलनाबाबत टुलकिट सोशल मीडियावरून पसरवल्याचा आरोप दिशा रवी हिच्यावर ठेवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टुलकिट प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात दिशा रवी ही एक प्रमुख आरोपी आहे. टुलकिट सोशल मीडियावरून पसरवण्याबरोबरच त्यात दुरुस्ती केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. सायबर पोलिसांचे विशेष पथक आरोपीची कोठडी मिळाल्यानंतर पुढील तपास करेल. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी आणखी काही व्यक्तींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.