नवी दिल्ली - गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, चीनच्या आडमुठेपणामुळे समस्यांवर तोडगा निघालेला नाही. गलवान खोऱ्यातील चकमकीत चिनी सैन्याने भारतीय जवानांना मारण्यासाठी अणकुचीदार खिळे लावलेले रॉड वापरले होते. आता पुन्हा दोन्ही देशादरम्यान संघर्ष झाल्यास चीनला योग्य प्रत्त्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यांकरीता दिल्लीमधील एका कंपनीने आपल्या पारंपारिक शस्त्रांद्वारे प्रेरित गैर प्राणघातक असणारी वज्र, त्रिशूल आणि इतर शस्त्रे तयार केली आहेत. या शस्त्राद्वारे शत्रूला जखमी करता येणार आहे.
नोएडामधील एका स्टार्ट-अप फर्मने सांगितले की, गलवान खोऱ्यातील चकमकीनंतर भारतीय सुरक्षा दलांकडून त्यांना चिनींशी सामना करण्यासाठी सक्षम उपकरणे पुरवण्याचे काम सोपवण्यात आले होते आणि त्यांनी पारंपारिक भारतीय शस्त्रे जसे भगवान शिव यांचे 'त्रिशूल' पासून प्रेरणा घेत शस्त्रे तयार केली आहेत.