चेन्नई - देशभरामध्ये कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. मात्र, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यात अनेकांनी निष्काळजीपणा करत कोरोना नियमांचे पालन केले नाही. हा निष्काळजीपणा जीवावर बेतला आहे. तामिळनाडूमधील काँग्रेसच्या उमेदवाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
तामिळनाडू आणि पुडुचेरीचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (एआयसीसी) प्रभारी सचिव संजय दत्त यांनी ट्विटरवरून माधव राव यांच्या निधनाची माहिती दिली. दु:खाच्या क्षणी माधव राव यांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत, असे संजय दत्त यांनी टि्वटमध्ये म्हटलं.
काँग्रेसचे उमेदवार पीएसडब्ल्यू माधव राव यांनी श्रीविलिपुथुर मतदारसंघातून निवडणूक लढवली. उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर ते आजारी पडल्याची माहिती आहे. कोरोना चाचणी केल्यानंतर ते पाझिटिव्ह आढळले. त्यांच्या फुफ्फुसातही इन्फेक्शन झालं होतं. यामुळे ते निवडणुकीत प्रचारही करू शकले नाहीत. त्यांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या मुलीने सांभाळल्याची माहिती आहे.