कोलकाता - 'खेला होबे' ही घोषणा देत पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला धूळ चारल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आता राष्ट्रीय राजकारणात उतरल्या आहेत. त्यांच्या ‘खेला होबे’ म्हणजे खेळ होणार या घोषणेने राजकीय मंचावर महत्त्व मिळवलं असून राष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाली. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘खेला होबे दिवस’ साजरा करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. 16 ऑगस्टला पश्चिम बंगालमध्ये ‘खेला होबे दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. फक्त पश्चिम बंगालमध्ये नाही, तर त्रिपूरात आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.
‘खेला होबे दिवस’ साजरा करून भाजपाच्या विरोधात तर टीएमसीच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ममता करत आहेत. 16 ऑगस्टला टीएमसीकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. तर भाजपाकडून यावर टीका करण्यात आली आहे. 16 ऑगस्टला हा दिवस साजरा करून टीएमसी 1946 मध्ये 'द ग्रेट कोलकाता किलिंग'च्या आठवणींच्या जखमा ताज्या करत आहे, असा आरोप भाजपाने केला आहे. स्वातंत्र्यापूर्वी मुस्लिम लीगने 'थेट कारवाई' ही घोषणा दिली होती. या घोषणेतून कोलकातामध्ये दंगल सुरू झाली. त्याला कलकत्ता दंगल किंवा ग्रेट कलकत्ता किलिंग असे म्हणतात. 'खेल होबे' अत्याचाराचे प्रतीक बनले असल्याची टिका भाजपाचे राज्यसभा सदस्य स्वप्ना दासगुप्ता म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये दणक्यात विजय मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेसची नजर आता उत्तर प्रदेशकडे वळाली आहे. उत्तर प्रदेशात येत्या वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर 'खेला होबे'ची घोषणा देत राज्यातील लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना टीएमसी दिसून येत आहे. 16 ऑगस्टला उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी टीएमसीचे उत्तर प्रदेशचे प्रभारी नेत्याने राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे. मात्र, अद्याप त्यांना सरकारकडून उत्तर मिळालेले नाही. जर सरकारने परवानगी दिली नाही, तर हे स्पष्ट होईल, की 'खेला होबे' घोषणेने भाजपाला धडकी भरली आहे, असे टीएमसीचे नेते तापस रॉयइस यांनी म्हटलं.