अहमदाबाद -पुढील वर्षात गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून राजकीय वातावरण गरम होत चालले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रणशिंग फुंकलं आहे. गुजरातमध्ये बसपा, एआयएमआयएम आणि आम आदमी पार्टी (आप) च्या प्रवेशानंतर आता ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेस (टीएमसी) देखील गुजरातमध्ये एन्ट्री करणार आहे. बंगालबाहेर भाजपाला टक्कर देण्यासाठी ममता बॅनर्जी रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे आगामी वर्षीच्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका रंगतदार होणार, असे दिसते.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 21 जुलै रोजी शहीद दिनाला संबोधित केले. त्यांच्या भाषणाचे प्रसारण देशभरात करण्यात आले होते. गुजरातमध्येही ममतांच्या भाषणासाठी एलईडी स्क्रीन बसवण्यात आल्या होत्या. दीदींचे होर्डिंग्ज पक्षाने अहमदाबाद, सूरत आणि वडोदरा येथे लावली होती. मात्र, काही ठिकाणी ती हटवण्यात आली होती. ममता बॅनर्जीं राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्यासाठी तयार आहेत. याची सुरवात त्या गुजरातपासून करणार असल्याचे बोलले जात आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
2022 साली होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागांवर (182 जागांवर) आम आदमी पक्षाकडून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहेत. तर ममता बॅनर्जीही आपले उमदेवार रिंगणात उतरवणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.