नवी दिल्ली :कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्यासाठी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा या आक्रमक झाल्या आहेत. भारतीय कुस्तीपटू मुलींना भाजपच्या नराधमांपासून का वाचवले जात नाही, असा सवाल खासदार महुआ मोइत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. त्यामुळे हा वाद आता पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.
मन की बातवरुन लगावला टोला :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'पूर्वी तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी ट्विट करून पंतप्रधानांना टोला लगावला. या विशेष एपिसोडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या काही मुद्द्यांवर बोलावे. जंतरमंतरवर कुस्तीपटूंच्या संपाबाबत मोइत्रा यांनी पंतप्रधान मोदींना दोन प्रश्न विचारले आहेत. त्यातील एक जंतरमंतरवर कुस्तीपटूंच्या सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आहे. तर दुसरा अदानी समूहाच्या चौकशीबाबत आहे. अदानी समूहाविरुद्धच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित करताना त्यांनी अदानींची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वेळेत का पूर्ण करता येत नाही, असेही विचारले आहे.
अदानींचा तपास पूर्ण करू शकत नाही :देशातील खेळाडू मुलींचे विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐकणार नाहीत का? खेळाडू मुलींना भाजपच्या नराधमांपासून का वाचवता येत नाही? असा सवालही मुआ मोइत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले. यासोबतच मोइत्रा यांनी अदानी प्रकरणाबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत सेबी अदानीचा तपास का पूर्ण करू शकत नाही? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.
ब्रिजभूषण सिंहाना अटक करण्याची मागणी :भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कुस्तीपटूंनी केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भारतीय कुस्तीपटू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळ आणि धमकीचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. कुस्तीपटूंच्या या आंदोलनावर आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यावरही खासदार मोइत्रा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा - Brij Bhushan Sharan Singh: ब्रिजभूषण शरण सिंह यांचे प्रियंका गांधींना आव्हान! म्हणाले, माझ्या विरुद्ध निवडणूक लढवा