नवी दिल्ली - पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड आणि टीएमसी यांच्यादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राज्यपाल जगदीप धनखड यांनी आज टि्वट करत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली होती. राज्यात लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली जात असल्याची टीका त्यांनी केली. यानंतर टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांनी टि्वट करत राज्यपालांवर निशाणा साधला. राज्यपाल जगदीप धनखड यांनी राजभवनात आपल्या नातेवाईकांची नियुक्ती केली आहे, असा आरोप महुआ मोइत्रा यांनी केला. संबंधित नातेवाईकांच्या नावाची लिस्टही त्यांनी टि्वटद्वारे जारी केली.
खासदार महुआ मोइत्रा यांनी रविवारी टि्वट करत राज्यपालांवर घराणेशाहीचा आरोप केला आहे. तसेच मोइत्रा यांनी राज्यपालांना 'अंकल जी' असे संबोधले. महुआ यांनी राजभवनात कार्यरत राज्यपालांच्या नातेवाईकांची लिस्ट जारी केली. यात सहा जणांची नावे आहेत. अभुद्योय सिंग शेखावत, अखिल चौधरी आणि किशन धनकर,रूची दुबे, प्रशांत दिक्षित आणि श्रीकांत जनार्दन राव हे राज्यपालांचे नातेवाईक आहेत.