कोलकाता : नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुका भाजपच्या बाजूने एकतर्फी होतील असे समजणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अनेक प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल असे त्यांनी म्हटले आहे. 90 वर्षीय सेन यांनी असेही म्हटले की, तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यात भारताच्या पुढील पंतप्रधान होण्याची क्षमता आहे, मात्र त्यासाठी त्यांना मतदारांमध्ये असलेल्या भाजप विरोधी भावनांना एकत्र करणे गरजेचे आहे.
प्रादेशिक पक्ष महत्त्वाचे : ते म्हणाले, 'मला वाटते की अनेक प्रादेशिक पक्ष महत्त्वाचे आहेत. माझ्या मते डीएमके हा एक महत्त्वाचा पक्ष आहे. टीएमसी निश्चितच महत्त्वाची आहे आणि समाजवादी पक्षाचेही स्वत:चे एक स्थान आहे, पण ते वाढवता येईल का? हे मला माहीत नाही. ते म्हणाले, 'मला वाटते की भाजपची जागा घेऊ शकणारा दुसरा कोणताही पक्ष नाही, कारण त्या पक्षाने स्वत:ला असे प्रस्थापित केले आहे, असे नाकारणारा दृष्टिकोन घेणे चुकीचे ठरेल.' ममता बॅनर्जी देशाच्या पुढील पंतप्रधान होऊ शकतात का? असे विचारले असता सेन म्हणाले की, त्यांच्याकडे क्षमता आहे. ते म्हणाले, 'तसे करण्याची क्षमता त्यांच्यात नाही, असे नाही. त्याच्याकडे निश्चितच क्षमता आहे. तसेच भारतातील गटबाजी संपवण्याचे नेतृत्वही त्यांच्याकडे आहे'.
भाजपची विचारसरणी संकुचीत : राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दल (युनायटेड) यांसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससह नवीन आघाडीची हाक दिली आहे. ध्रुवीय लढतीमुळे भाजपचा पराभव करणे सोपे होईल असे त्यांचे आकलन आहे. ते म्हणाले, 'भाजपने भारताची छबी संकुचित बनवली आहे. केवळ हिंदू भारत आणि हिंदी भाषिक भारत अशी भारताची समज सध्या बनत चालली आहे. आज भारतात भाजपशिवाय पर्याय नसेल तर ते वाईटच आहे. ते म्हणाले, 'भाजप मजबूत आणि ताकदवान दिसत असला तर त्यात कमकुवतपणाही आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांनी खरोखरच प्रयत्न केल्यास ते भाजपला टक्कर देऊ शकतात असे मला वाटते.