कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत आज (गुरुवार) तृणमूल आणि भाजपाच्या शिष्टमंडळाने निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. याप्रकरणी तृणमूलतर्फे खासदार डेरेक ओब्रायन, राज्यमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य आणि पार्थ चॅटर्जी यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली.
यानंतर माध्यमांशी बोलताना डेरेक ओब्रायन म्हणाले, की "९ मार्चला निवडणूक आयोगाने डीजीपींना बदलण्याचे आदेश दिले. दहा मार्चला एका भाजपा नेत्याने 'संध्याकाळी पाच वाजल्यानंतर तुम्हाला कळेल की काय होणार आहे' अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास ममतांवर हल्ला झाला. या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. सत्य लवकरात लवकर बाहेर यावे अशी आमची मागणी आहे."
"या निंदनीय प्रकाराला जबाबदार व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्यात यावी. ही घटना घडल्यानंतर केवळ अर्ध्या तासातच विविध प्रकारची वक्तव्ये समोर येऊ लागली होती. अशा वक्तव्यांचा आणि आरोपांचाही आम्ही निषेध करतो. या हल्ल्याबाबत कोणाला शंका असल्यास त्यांनी डॉक्टरांशी बोलून घ्यावे" असेही ओब्रायन पुढे म्हणाले.