अजमेर -राजस्थान दौर्याच्या दुसर्या दिवशी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अजमेर जिल्ह्यातील रूपनगर भागात ट्रॅक्टर मेळावा घेतला. राहुल गांधींनी कृषी कायद्यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. मोदी सरकारला तीन कृषी कायद्याद्वारे शेतकऱयाला आणखी गरीब बनवायचे आहे. देशातील सर्वात मोठा कृषी व्यवसाय शेतकऱयांकडून हिसकावून दोन व्यक्तींककडे सोपवायचा आहे, अशी टीका त्यांनी मोदींवर केली.
भारतातील सर्वात मोठा व्यापार म्हणजे शेती व्यापार. देशातील 40 टक्के लोक या व्यापाराशी जोडलेले आहेत.छोटे उद्योजक, मजूर, फळे आणि भाज्या विक्रेते सर्व शेती व्यापाराशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जोडलेले आहेत, असे ते म्हणाले.
उद्योजक 40 टक्के धान्यावर नियंत्रण ठेवतील. स्वस्त दरात शेतकऱ्यांकडून धान्य, फळे आणि भाज्या खरेदी करतील आणि सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना पुन्हा महागड्या दराने विकतील, असे राहुल गांधी म्हणाले .
शेतकरी मोदींशी बोलण्यास तयार नाहीत. जोपर्यंत कृषी कायदे मागे घेत नाहीत, तोपर्यंत ते मोदींशी बोलणार नाहीत. उद्योगपती धान्य, फळे आणि भाज्या साठवू शकतात. यामुळे अमर्यादित साठेबाजी होईल, असे राहुल गांधी म्हणाले. यापूर्वी लोकसभेत राहुल गांधी यांनी राहुल गांधी यांनी तीन कायद्यांचा हेतू आणि मसुद्याचे विश्लेषण करून सांगण्याचा प्रयत्न केला होता.