गुवाहाटी : गेंड्यांची शिकार करुन त्यांच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या एका टोळीला आसाम पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत कारबी अंगलॉंग जिल्ह्यातून या तीन जणांच्या टोळीला पकडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
वेल्सन टेरॉन (३४), देरेशँग रेंगमा (३६) आणि अलो रेंगमा (२९) अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांकडून काही अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. यांपैकी अलो हा नागालँडचा रहिवासी आहे, तर इतर दोघे आसामचेच असल्याची माहिती आसाम पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिली.
या तिघांकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये दोन एके-४७, लोडेड मॅगझीन, एके-४७ची ३० जिवंत काडतुसे आणि इतर काही साहित्याचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून काझीरंगा नॅशनल पार्क आणि व्याघ्र प्रकल्प, तसेच आसाममधील इतर राष्ट्रीय उद्यानांमध्ये गेंड्यांची शिकार करुन त्यांची शिंगे आंतरराष्ट्रीय बाजारात विकण्याचे प्रकार वाढले होते. यामुळे सरकारने आणि वन प्रशासनाने याबाबत कडक कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात सुमारे २,४०० एकशिंगी गेंडे आहेत. संपूर्ण जगातील गेंड्यांपैकी दोन तृतीयांश गेंडे हे काझीरंगामध्ये आढळतात. त्यामुळे यांची शिकार होणे ही गंभीर बाब आहे. यासोबतच काझीरंगामध्ये १२१ वाघ, एक हजारांहून अधिक हत्ती तसेच इतर अनेक वन्यजीव राहतात.
हेही वाचा :मुस्लीम व्यक्तीने उभारले हिंदू मंदिर; कर्नाटकात धार्मिक एकात्मतेचा आदर्श