रायपूर :२०१३मध्ये एका स्थानिक पत्रकाराची हत्या करणाऱ्या तीन नक्षलवाद्यांनी आज (मंगळवार) आत्मसमर्पण केले आहे. छत्तीसगडच्या बैजपूरमध्ये ही घटना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हे नक्षलवादी बासागुडा-जागरगुंडा भागात सक्रिय होते. माओवादी 'पोकळ'विचारसणीने केलेली निराशा आणि वरिष्ठांच्या अत्याचारांना कंटाळून या तिघांनी पोलीस आणि सीआरपीएफ जवानांसमोर आत्मसमर्पण केले. आलम बामो (२४), मोदियाम सुंदर (२७) आणि मदम मोतू (२८) अशी या तिघांची नावे आहेत.
दोन मोठ्या हल्ल्यांमध्ये सहभाग..
यांपैकी आलम हा कार्यकारी पथकाचा डेप्युटी कमांडर होता. तर सुंदर हा त्याच्याच पथकातील एक सदस्य होता. तसेच, मोतू हा पुरवठा पथकाचा सदस्य होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या तिघांनी यापूर्वी सुरक्षा दलांवर अनेक वेळा हल्ले केले होते. यामध्ये २०१२ सालच्या आयईडी ब्लास्टचाही समावेश होता. या हल्ल्यात सुरक्षा दलांच्या दोन जवानांना वीरमरण आले होते.