नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सोमवारी लोकसभेत तीन विधेयके गदारोळातच पारीत करण्यात आली. यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवित दहा मिनिटांत डोसा बनविल्याप्रमाणे तीन विधेयके मंजूर केल्याची घणाघाती टीका सरकारवर केली. दरम्यान, विरोधकांनी पेगाससच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी आक्रमकपणे लावून धरल्यामुळे संसदेत मोठा गदारोळ सोमवारी बघायला मिळाला.
सदनात लोकशाहीची हत्या
सरकारने सोमवारी लोकसभेत तीन महत्वाची विधेयके गोंधळातच मंजूर केली. यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार आक्षेप नोंदविला. सदनात लोकशाहीची हत्या केली जात असल्याची टीका काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि मनीष तिवारी यांनी केली. चर्चेविनाच विधेयके मंजूर केल्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे.
डोसा बनविल्याप्रमाणे विधेयके मंजूर
आरएसपीचे एनके प्रेमचंद्रन यांनी विधेयके मंजूर करण्यावरून सरकारवर घणाघाती टीकाक केली. केवळ दहा मिनिटांत डोसा बनविल्याप्रमाणे तीन विधेयके मंजूर करण्यात आल्याची टीका प्रेमचंद्रन यांनी सरकारवर केली.