मुंबई : देशासमोर आज अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. यासाठी आज आम्ही तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर ( Telangana CM K Chandrashekhar Rao ) यांच्याशी चर्चा केली. आजची बैठक ही राजकीय बैठक न म्हणता विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करणारी बैठक असल्याचे शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांनी सांगितले. विकासाच्या मुद्द्यांवर जे कोणी पक्ष एकत्र येते त्यांना सोबत घेण्याचा विचार आहे. त्यासाठी पुढील बैठकीत अधिक चर्चा होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
दोन्ही नेत्यांचे एकमत
शरद पवार आणि केसीआर यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाली. सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
बेरोजगारी, विकास, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर समविचारी पक्षांचा एकत्र येण्याचा विचार : शरद पवार
परिवर्तनासाठी अन्य पक्षांनाही सोबत घेण्याचा विचार केसीआर
देशात परिवर्तनाची गरज असून, त्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती केसीआर यांनी यावेळी बोलताना दिली. शरद पवार यांनी या नव्या आघाडीसाठी आपल्याला आशीर्वाद दिला असून, आता अन्य पक्षांशी चर्चा करणार आहोत. त्यासाठी लवकरच हैदराबाद येथे एक बैठक घेणार असून, त्यासाठी सर्वांना निमंत्रित करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.