ठाणे : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका शुभदा पावगी ह्या डोंबिवली पूर्वेकडील लोकमान्य टिळक रोडवरील अलंकार सोसायटीत राहतात. त्यातच २६ फेब्रुवारी (रविवारी) सायंकाळच्या सुमारास फडके रोडवरील प्रसिद्ध गणपती मंदिर देवस्थानाच्या सभागृहात शास्त्रीय संगीता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गायिका शुभदा ह्या सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर रात्री नऊ वाजल्याच्या सुमारास शास्त्रीय संगीता कार्यक्रम संपल्यावर गायिका शुभदा ह्या मुलासोबत घरी जाण्यासाठी पायी निघाल्या होत्या.
गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले :त्याच सुमाराला टिळक रोड वरील ब्राह्मण सभेनजीक असलेल्या एका दुकानासमोरून जात असतानाच शुभदा पावगी यांच्या समोरून एक लाल रंगाची भरधाव दुचाकीवरून दोघे आले. अचानक दुचाकी शुभदा यांच्या समोर येताच, त्या थोड्या बाजुला झाल्या. तेवढ्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोराने शुभदा यांच्या मानेवर जोराची थाप मारून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जोराने हिसकावून धूम स्टाईलने दुचाकीवरून पळून गेले. मात्र चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकताना जोरात फटका बसल्याने त्यांच्या मानेला जखम झाली आहे. शुभदा पावगी (वय,७९) असे शास्त्रीय संगीत गायिकेचे नाव आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा तपास सुरू : मंगळसूत्र हिसकावून चोरटे काही क्षणात पसार झाल्यानंतर गायिका आणि सोबत असलेल्या मुलाने ओरडा ओरडा केला. मात्र, तोपर्यंत दोन्ही चोरटे दुचाकीवरून पळून गेले होते. याप्रकरणी ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका शुभदा पावगी यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्या विरोधात काल रात्रीच्या सुमारास तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी या तक्रारीनुसार टिळक रोड आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा तपास सुरू केला आहे.
या भागात गस्त वाढविण्याची मागणी : या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर करत आहेत. मात्र भर रस्त्यात वर्दळीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये चोरट्याची दहशत पसरल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवाय पोलिसांनी या भागात गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांसह व्यापारी वर्ग करत आहेत. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गायिकेच्या तक्रारीवरून दुचाकीवरून आलेल्या अनोखळी दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील डोंबिवली शहरात ही घटना घडली, जेव्हा गायिका शुभदा पावगी आपल्या मुलासोबत घरी चालल्या होत्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी या महिलेला मारहाण करून तिची दोन लाख रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली.
हेही वाचा :Mumbai Crime: तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी लुटून दरोडेखोर पसार; आरोपीला 24 तासात अटक