मुंबई : देशात सध्या राजकीय वातावरणात बदलत होत चालले आहेत. राज्यकारभार दूर राहिला, सूडाच राजकारणात अत्यंत खालच्या पातळीचे केले जातेय. सुडाचे राजकारण ही आमची संस्कृती नाही, असे हिंदुत्व तर अजिबातच नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला टोला लगावला. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ( Telangana CM K Chandrashekhar Rao ) यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) त्यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन जवळपास सव्वा तास देशाच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा ( KCR Thackeray Meet ) केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी के कविता, पल्ला राजेश्वर रेड्डी, रणजीत रेड्डी, बीबी पाटील, जय संतोष राव आणि खासदार संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुभाष देसाई, आदी मंडळी उपस्थित होती. पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते.
ठाकरे म्हणाले की, असचं सुरु राहिल तर, देशाचे भविष्य काय ? मुख्यमंत्री, पंतप्रधान होत राहतील. मात्र देशाचे काय होईल? याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबत विचार करण्याची सुरुवात आमच्याकडून आम्ही केली आहे. देशामध्ये राज्य एकमेकांबाबत शेजारधर्म विसरले आहेत. तेलंगणा आणि महाराष्ट्राला हजार किलोमीटरची सीमा आहे. त्यामुळे आम्ही सख्खे शेजारी असल्याने, राज्याराज्यांमध्ये चांगलं वातावरण राहिले पाहिजे असं मतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केलं. सध्या सुरू असलेले राजकारण देशाला खड्ड्यात घालणार आहे, असं म्हणत केंद्र सरकारला मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला. तसेच एका नव्या विचारांची सुरुवात आज झाली. एक चांगली दिशा ठरवून वाटचाल करणारा असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
केंद्र सरकारवर टीका
आज ज्याप्रकारे देशाचा कारभार सुरू आहे. त्यामध्ये बदल येणे गरजेचे आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही जे बदल होणे गरजेचे होते ते, झाले नाहीत. यावर आम्ही दोघे सहमत आहोत. येणाऱ्या काळात देशाला खूप मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. देशात वातावरण खराब न करता त्याला चांगल्या दिशेने पुढे नेणे गरजेचे आहे. देशाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी इतर प्रादेशिक पक्षासोबत चर्चा करणार असल्याचं चंद्रशेखर राव यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातून जो मोर्चा निघतो, तो नेहमीच सफल होतो. शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंकडून मिळालेली प्रेरणा घेऊनच आता आम्ही पुढे जाणार असल्याचे के चंद्रशेखर राव यावेळी म्हणाले.
केंद्र सरकार कडून केंद्रीय तपास यंत्रणेचा चुकीचा वापर
केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा खूप वाईट पद्धतीने वापर केला जातो आहे. केंद्र सरकारकडून हे चुकीचं सुरू आहे. केंद्र सरकारने याबाबतची आपली नीती बदलली पाहिजे. नाही तर, येणाऱ्या काळात त्यांना नक्कीच धडा मिळेल असा विश्वास के चंद्रशेखर राव यांनी बोलून दाखवला.