गांधीनगर : गुजरातच्या भरुच जिल्ह्यात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका महिलेच्या थडग्यातून तिचे केस चोरी करताना तीन जणांना पकडण्यात आले. या तिघांपैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत.
अल्पवयीन मुले करतात चोरी
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून भरुच जिल्ह्यातील इखार गावामध्ये असलेल्या दफनभूमीतील थडगी उकरण्याचा प्रकार घडत होता. हे कोण आणि कशासाठी करत आहे याबाबत ग्रामस्थांना काहीही माहिती नव्हती. त्यानंतर दोन ते तीन दिवसांपूर्वी या दफनभूमीतून ग्रामस्थांनी तीन लोकांना पळून जाताना पाहिले. यावेळी लोकांनी त्यांना पकडून त्यांची चौकशी केली असता याबाबत त्यांनी मृतदेहाचे केस चोरण्यासाठी असे केल्याची कबूली दिली. या आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन असून, तिसऱ्याचे नाव इक्बाल आहे.
थडग्यातून असे चोरायचे केस..
पकडल्यानंतर या तिघांनी आपल्या कृत्याची कबुली दिली. त्यांनी सांगितले, की ते थडग्याच्या वरच्या बाजूला छोटेसे छिद्र करायचे. त्यात तार टाकून ते आतील मृतदेहाचे केस ओढून घेत आणि ते कापून चोरून पळून जात. या सर्वांची चौकशी करतानाचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अमोदचे पोलीस उपनिरीक्षक एन. एम. सुथार यांनी याबाब माहिती दिली. मात्र, याप्रकरणी कोणतीही पोलीस तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.