हल्दवाणी (उत्तराखंड) : चोरी करताना चोर काय करतील याचा भरवसा नाही. अशीच एक अनोखी चोरी उत्तराखंडमध्ये उघडकीस आली आहे. चोरांनी चोरी करत असताना भूक लागल्याने आधी घरातील स्वयंपाकघरात जाऊन खिचडी बनवून खाल्ली. त्यानंतर सगळ्या घरात उचकापाचक केली. नंतर दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांना सापडली. मग सकाळ होण्याच्याआधीच चोरट्यांनी चोरी केलेल्या घरातून धूम ठोकली. या चोरीची परिसरात चांगलीच चर्चा होत आहे.
पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू :मुखणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची विचित्र घटना उघडकीस आली आहे. येथे चोरट्यांनी घरात घुसून आधी आंघोळ केली आणि नंतर जेवणही केले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण घराची झडती घेतली आणि सामानासह पसार झाले. चोरट्यांनी लक्ष्य केलेले घर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवृत्त अधिकाऱ्याचे असल्याचे सांगितले जात आहे. आता पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
पाच महिन्यांपासून घर होते बंद :चोरट्यांनी बंद असलेले घर टार्गेट केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुखणी येथील हिम्मतपूर मल्ला येथील एसबीआयचे सेवानिवृत्त अधिकारी लक्ष्मणसिंह अधिकारी यांच्या घरी ही चोरी झाली. असे सांगितले जात आहे की, लक्ष्मण सिंह पाच महिन्यांपूर्वी 6 सप्टेंबर 2022 रोजी आपल्या मुलाला भेटण्यासाठी जमशेदपूरला गेले होते. तेव्हापासून घराला कुलूप आहे. शेजारी घर सांभाळत होते.