दुबई -आशिया चषक २०२२ स्पर्धेबाबत बुधवारी मोठी अपडेट्स समोर आले आहे. २१ जुलैला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE येथे होणार असल्याचे जाहीर केले होते. त्याबाबत आज आशियाई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जय शाह ( Jay Shah) यांनी मोठी घोषणा केली. ( Asia Cup 2022 ) श्रीलंकेत सुरू असलेल्या राजकिय परिस्थितीमुळे आशिया चषक २०२२ हे तिथे होणार नाही, हे निश्चित होते. त्यासाठी बांगलादेश, UAE आणि भारत यांचेही नाव चर्चेत होते. पण, आज अखेर त्यावर पडदा पडला. ही स्पर्धा श्रीलंकेच्याच यजमानपदाखाली UAE येथे होणार असल्याची घोषणा, जय शाह यांनी केली.
तेव्हाही भारताने बाजी मारली - १९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. ( Asia Cup shifted to UAE ) तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. २०१८मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला आणि तेव्हाही भारताने बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत भारताने सर्वाधिक ७ जेतेपदं पटकावली आहेत. पाच जेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या आमि दोन विजयासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे.