नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी लाल किल्ल्यावर शीख गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. याप्रसंगी ते विशेष नाणे आणि टपाल तिकीटही जारी करतील. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) बुधवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. केंद्र सरकार दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लाईट अँड साऊंड कार्यक्रमाचेही सादरीकरण - बुधवारपासून दोन दिवसीय महोत्सव सुरू होत आहे. देशाच्या विविध भागांतील रागी (भजन कीर्तन गायक) आणि मुलेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, शीख गुरु तेग बहादूर यांच्या जीवनावर आधारित लाईट अँड साऊंड कार्यक्रमाचेही सादरीकरण केले जाणार आहे.
'आझादी का अमृत महोत्सव' - या समारंभात शिखांच्या पारंपारिक मार्शल आर्ट 'गटका'चेही आयोजन करण्यात येणार असल्याचे पीएमओने म्हटले आहे. 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पीएमओच्या मते, या कार्यक्रमाचा उद्देश गुरु तेग बहादूर यांच्या शिकवणीला अधोरेखित करणे हा आहे.