नवी दिल्ली -आपल्या गटाला 'खरी शिवसेना' म्हणून ओळखण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव-नेतृत्वाखालील गटाने निवडणुक आयोगाच्या ( Election Commission of India ) कार्यवाहीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेना पक्षातील मतभेदाच्या प्रकरणांमध्ये, उद्धव ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मांडले की, हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्याची गरज आहे. नबाम रेबिया विरुद्ध डेप्युटी स्पीकर मधील 2016 च्या घटनापीठाने दिलेल्या निकालाच्या योग्यतेचा विचार करण्यासाठी त्यांनी कोर्टाला विनंती केली.
7 न्यायाधीशांचे खंडपीठाची मागणी: नबाम रेबियामध्ये, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने असा निर्णय दिला होता की जेव्हा स्पीकरला पदावरून हटवण्याची मागणी करणारा ठराव प्रलंबित असेल तेव्हा तो अपात्रतेची कार्यवाही सुरू करू शकत नाही. सिब्बल यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समावेश असलेल्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आपले म्हणणे सादर केले. यावर सरन्यायधीश चंद्रचूड म्हणाले की, हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवायचे की नाही हे 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने ठरवायचे आहे तेव्हा या मुद्द्यावर युक्तिवाद केला जाऊ शकतो. त्यासाठी लेखी अर्ज करण्याची सूचना न्यायालयाने वकिल कपिल सिब्बल यांना केली.