नवी दिल्ली - देशातील या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (दि. ८ नोव्हेंबर)रोजी होणार आहे. चंद्रोदयाच्या वेळी हे ग्रहण भारतातील सर्व ठिकाणांहून दिसणार आहे. भूविज्ञान मंत्रालयाच्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. (Lunar Eclipse) मंत्रालयाच्या निवेदनानुसार, 'ग्रहणाच्या आंशिक आणि पूर्ण टप्प्याची सुरुवात भारतातील कोणत्याही ठिकाणाहून दिसणार नाही कारण ही घटना भारतात चंद्रोदयाच्या आधी सुरू झालेली असते.'चंद्रग्रहणाच्या पूर्ण आणि आंशिक दोन्ही टप्प्यांचा शेवट देशाच्या पूर्वेकडील भागातून दिसेल, असे सांगण्यात आले आहे. उर्वरित देशातून केवळ आंशिक टप्प्याचा शेवट दिसेल.
Lunar Eclipse: वर्षातील शेवटचे संपूर्ण चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर रोजी भारतात दिसणार
दोन दिवसांनंतर म्हणजे ८ नोव्हेंबरला संपूर्ण चंद्रग्रहण होणार आहे. चंद्रोदयाच्या वेळी हे ग्रहण भारतातील सर्व ठिकाणी दिसेल. हे वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असेल.
मंत्रालयाने सांगितले की, भारतात संपूर्ण चंद्रग्रहण ८ नोव्हेंबरला होणार आहे. चंद्रग्रहण दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, उत्तर अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर या भागात दिसणार आहे. देशाच्या पूर्वेकडील भागात, कोलकाता आणि गुवाहाटीसारख्या शहरांमध्ये, चंद्रोदयाच्या वेळी ग्रहणाचा पूर्ण टप्पा सुरू होईल. कोलकातामध्ये चंद्रोदयाच्या वेळेपासून पूर्ण टप्पा संपेपर्यंतचा कालावधी 20 मिनिटांचा असेल आणि चंद्रोदयाच्या वेळेपासून ग्रहणाचा आंशिक टप्पा संपेपर्यंतचा कालावधी 1 तास 27 मिनिटांचा असेल. गुवाहाटीमध्ये चंद्रोदयाच्या वेळेपासून पूर्ण टप्पा संपेपर्यंतचा कालावधी 38 मिनिटांचा असेल.
दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये ग्रहणाचा पूर्ण टप्पा संपल्यानंतर चंद्रोदय होईल आणि त्या वेळी आंशिक ग्रहण होईल. या शहरांमध्ये, चंद्रोदयाच्या वेळेपासून ग्रहणाचा आंशिक टप्पा संपेपर्यंतचा कालावधी अनुक्रमे 50 मिनिटे, 18 मिनिटे, 40 मिनिटे आणि 29 मिनिटे असेल. भारतात पुढील चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर 2023 रोजी होईल, जे आंशिक चंद्रग्रहण असेल.