कोलकाता :देशात सध्या द केरळ स्टोरी या चित्रपटावरुन चांगलाच गदारोळ सुरू आहे. मात्र त्या अगोदर द काश्मीर फाईल या चित्रपटाचा वादही अद्याप संपता संपेना असेच दिसून येत आहे. आता 'द काश्मीर फाइल्स'चे निर्माते अभिषेक अग्रवाल, विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाला विरोध करत मंगळवारी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अन्यथा त्यांनी केलेले विधान खरे असल्याचे सिद्ध करावे, असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
|
चित्रपटातील संवाद खोटे असल्याचे सिद्ध करावे :काश्मीर फाइल्सचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी अनेक पत्रकार, राजकारणी काश्मीर फाइल्सला प्रोपगंडा म्हणत होते. मात्र आता पुरे झाले असे वाटते. जे काश्मीर फाइल्स या चित्रपटाला प्रोपोगंडा म्हणत आहेत, त्यांनी चित्रपटातील कोणताही संवाद, दृश्य किंवा कोणतीही फ्रेम खोटी असल्याचे सिद्ध करावे. त्यामुळेच काश्मीर फाइल्सचे निर्माते विवेक अग्निहोत्री, अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांच्यासोबत ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
काय म्हणाल्या होत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी :बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ममता बॅनर्जी यांनी काश्मीर फाईल्स या चित्रपटाला भाजप निधी देते असे सांगितले होते. भाजप विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी चित्रपटालाही निधी देत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले होते. त्यामुळे अभिषेक अग्रवाल यांनी हे अपमानास्पद विधान आहे. या विधानाला कोणताही आधार नाही. ममता बॅनर्जी वोट बँकेला खूश करण्यासाठी अशी विधाने करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळेच आम्ही ममता बॅनर्जी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून त्यांना नोटीस पाठवल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.