अहमदाबाद - सुरतमधील जरीवाला कुटुंबातील ३६ सदस्य जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनास गेले होते. २५ मे २००६ ला दुचाकीवरून आलेल्या दोन दहशतवाद्यांनी जरीवाला परिवाराच्या बसवर ग्रेनेड हल्ला केला. ज्या ठिकाणी ग्रेनेड पडले तेथे या कुटुंबातील चार बालके होती. ८ वर्षांचा रॉबिन राकेशकुमार जरीवाला, १६ वर्षांची खूशबू जरीवाला, ८ वर्षाचा फेनिल जरीवाला आणि १६ वर्षाची शुखबू जरीवाला या हल्ल्यात ठार झाले. संपूर्ण देशभरात या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात आली होती. नुकतेच संसदेतून गुलाम नबी आझाद निवृत्त होत असताना पंतप्रधान मोदींनी या दुखद घटनेच्या आठवणी ताज्या केल्या.
१५ वर्षानंतर संसदेत दुखद घटनेच्या आठवणींना उजाळा -
या दहशतवादी हल्ल्याची आठवण काढताना गुलाम नबी आझाद आणि पंतप्रधान मोदी दोघांचेही डोळे पाणावले होते. २००६ साली जेव्ही ही घटना घडली होती तेव्ही पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. तर गुलाम नबी आझाद हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. या हल्ल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेची आठवण मोदींनी करून दिली. त्यावेळी चार मुलांचे मृतदेह आणि इतर सदस्यांना वायू दलाच्या विशेष विमानाने गुजरातला माघारी आणण्यात आले होते. या घटनेला १५ वर्ष उलटून गेली मात्र, जरीवाला कुटुंबीय अद्यापही चिमुकल्यांना गमावल्याच्या दु:खात आहे. ईटीव्ही भारतने जरीवाला कुटुंबीयांशी खास चर्चा केली. यावेळी सगळ्यांनी या घटनेची आठवण काढताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
संसदेत घटनेचा उल्लेख होईल, अशी कल्पना केली नव्हती -
आम्ही कोणीही कल्पना केली नव्हती की, १५ वर्षांनंतर संसदेत या घटनेचा उल्लेख होईल. या घटनेची आठवण काढणारे दुसरे कोणी नसून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी असती. पंतप्रधान या घटनेची आठवण काढून गहीवरले. गुलाम नबी आझाद यांनीही या दहशतवादी हल्ल्याची आठवण काढली. दोन्ही नेत्यांना तशीच्या तशी ही घटना माहिती आहे. हे पाहून जरीवाला कुटुंबाने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.