नवी दिल्ली- केंद्रीय कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात हिंसाचार घडवून आणण्याचा कट आखला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चार शेतकरी नेत्यांना ठार मारण्याचा कट असल्याची माहिती आंदोलनस्थळावरून ताब्यात घेतलेल्या एका संशयीत तरुणाने दिली. या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला माध्यमांसमोरही आणण्यात आले होते. यावेळी त्याने कटाची सविस्तर माहिती दिली.
ट्रॅक्टर रॅलीत शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याचा कट -
दिल्लीतील चार शेतकरी नेत्यांना ठार मारण्याचा कट येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकरी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. या रॅलीत हिंसाचार घडवून आणण्याचा कट आखला जात असल्याची माहिती तरुणाने दिली. यासाठी सुमारे ५० ते ६० हल्लेखोरांना तयार ठेवण्यात आले आहे. यातील काही पोलिसांच्या वर्दीत असतील. त्यांच्या पायात बूट असतील, असे वर्णन संशयीत तरुणाने केले.
पोलीस आणि आंदोलकांत हिंसाचार घडवण्याची योजना -
आंदोलकांवर गोळीबार करण्याचा कट आखला जात आहे. दिल्लीत येण्यापासून शेतकऱ्यांना रोखण्यासाठी गोळीबार केला जाईल. आंदोलकांमध्ये पोलिसांच्या वर्दीत हल्लेखोरही असतील. पोलीस आणि हल्लेखोरांमध्ये हिंसाचार घडवण्याचा कट या संशयीताने उघड केला आहे. पोलिसांनी नंतर या संशयीताला ताब्यात घेतले आहे.