कोलकाता : देशात 'द केरळ स्टोरी' चित्रपटावरून वाद सुरु असतानाच आता 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' या आगामी हिंदी चित्रपटाने एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. या चित्रपटाद्वारे पश्चिम बंगालची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करत कोलकाता पोलिसांनी चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना समन्स बजावला आहे. त्यांना 30 मे रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, बंगालचा अपमान करण्याचा आपला हेतू नसल्याचा दिग्दर्शकाचा दावा आहे. सखोल संशोधन करून खरे सत्य या चित्रपटात मांडण्यात आल्याचा दावा सनोज मिश्रा यांनी केला आहे.
पुराव्यांच्या आधारे चित्रपट बनवल्याचा दिग्दर्शकांचा दावा : ते म्हणाले की, 2 वर्षांपूर्वी त्यांनी बंगालच्या समस्यांवर संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांचा दावा आहे की त्यांनी चित्रपटात, बंगालची समाजव्यवस्था कशी कोलमडली आहे, बेरोजगारी कशी वाढत आहे, हे दाखवले आहे. बंगालमध्ये तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे हे सर्व घडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच सर्व माहिती आणि पुराव्यांच्या आधारे हा चित्रपट बनवल्याचा दावा सनोज मिश्रा यांनी केला आहे.