नवी दिल्ली : दिल्लीतील कांजवाला हिट अँड रन प्रकरणात शनिवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी तयार केलेले चार्जशीट हा फार मोठा मुद्दा मानला जात आहे. या प्रकरणी बाह्य दिल्लीच्या सुलतानपुरी पोलिसांनी सुमारे 800 पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. या आरोपपत्रात सुमारे 120 साक्षीदारांचा हवाला देण्यात आला आहे. तपासादरम्यान जमा झालेल्या पुराव्यांनाही आरोपपत्रात मोठा आधार देण्यात आला आहे.
३०२ अंतर्गत आरोप निश्चित : पोलिसांनी तयार केलेल्या या चार्जशीटमध्ये अमित खन्ना यांना आरोपी नंबर वन करण्यात आले असून त्यानंतर कृष्णा, मिथुन, मनोज मित्तल, दीपक खन्ना, अंकुश आणि आशुतोष यांची नावे आहेत. बाह्य दिल्ली पोलीस उपायुक्त हरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक खन्ना, अमित खन्ना, कृष्णा, मनोज आणि मिथुन हे न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, आशुतोष आणि अंकुश खन्ना अजूनही कोर्टातून जामिनावर आहेत. आरोपपत्रानुसार, पोलिसांनी अमित खन्ना, कृष्णा, मिथुन आणि मनोज मित्तल यांच्याविरुद्ध कलम आयपीसीच्या ३०२ अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. तर, अन्य आरोपींवर आरोपपत्र तयार करण्यात आले आहे.