श्रीनगर :जम्मू - काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा काश्मिरी पंडितावर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी एका बँकेच्या सुरक्षा रक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. संजय शर्मा असे त्यांचे नाव आहे. ते काश्मिरी पंडित होते. कलम 370 हटवल्यापासून दहशतवाद्यांनी खोोऱ्यात पुन्हा एकदा टार्गेट किलिंग सुरू केली आहे. त्यांचा मुख्य उद्देश राज्यात दहशत पसरवणे हा आहे, जेणेकरून पंडितांचे येथे परतणे शक्य होणार नाही.
370 हटवल्यानंतर परिस्थिती नॉर्मल : 370 हटवल्यानंतर राज्यातील वातावरण बरेच बदलले आहे. राज्यातील परिस्थिती हळूहळू सामान्य होऊ लागली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील वाढली आहे. राज्यात गुंतवणुकीचे वारेही वाहू लागले आहे. लोक सिनेमागृहापर्यंत पोहोचू लागले आहेत. अलीकडेच पठाण हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक सिनेमागृहात आले होते. पण दहशतवाद्यांसाठी आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांसाठी ही परिस्थिती पूर्णपणे अस्वस्थ करणारी आहे. पंडितांचे राज्यात पुनरागमन त्यांना नको आहे. यामुळेच ते पंडितांवर हल्ले करत आहेत. आजच्या हल्ल्यापूर्वी यापूर्वी असे अनेक हल्ले झाले आहेत ज्यात काश्मिरी पंडितांना लक्ष्य करण्यात आले आहे. अशाच काही हल्ल्यांवर एक नजर टाकूया.
काश्मिरी पंडित बांधवांवर हल्ला : काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट यांची गेल्या वर्षी 15 ऑक्टोबरला दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येची जबाबदारी काश्मिरी फ्रीडम फायटर्स नावाच्या संघटनेने घेतली होती. या घटनेपूर्वी 16 ऑक्टोबर 2022 रोजी दोन काश्मिरी पंडित बांधवांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सुनील कुमार भट्ट यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाला होता. हे दोघे भाऊ सफरचंदाच्य बागेत काम करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. या घटनेत दहशतवादी आदिल वानी याचा हात होता.