अनंतनाग - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या घटना घडतच आहेत. सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. या चकमकीत एक पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अद्याप ऑपरेशन सुरू असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली होती. अनंतनागनंतर बांदीपोराच्या गुंडजहागीर, हाजीन परिसरात चकमक सुरू झाली आहे.
दहशतवाद्यांकडून सामान्यांना लक्ष केले जात आहे. काश्मीरमधील सांप्रदायिक सौहार्द नष्ट करण्यासाठी सामान्य नागरिकांवर हल्ले होत आहे. गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी काश्मीरी पंडित, हिंदू आणि शीख समुदायाच्या नागिरकांना लक्ष्य केले होते. यात जवळपास 7 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर केंद्रीय गृह मंत्रालय चिंतेत आहे.
दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी गृह मंत्रालय मोठी कारवाई करणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्रालायने प्रदेश नेतृत्वाशी चर्चा केली आहे. काश्मीरमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांची यादी गुप्तचर संघटना आणि सुरक्षा संस्थाकडून यादी मागितली आहे. तसेच दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. मोदी सरकार इलेक्ट्रॉनिक इंटेल नेटवर्क भक्कम करत आहे. केवळ दहशतवाद आणि नक्षलवादी कारवायांवर पाळत ठेवणाऱ्या 'टीएमएस आणि एनएमबी' नेटवर्कचा देशभरात आणखी 451 ठिकाणी विस्तार केला जाणार आहे. गेल्या वर्षी सुरू केलेली ही मोहिम चालू वर्षाअखेर किंवा पुढील वर्षाच्या मध्यावर पूर्णत्वास नेण्याचा सरकारचा निर्धार आहे.