श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. आज(रविवार) सकाळी ही कारवाई करण्यात आली. काही संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर सुरक्षा दलांना शस्त्रसाठ्याबद्दल माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मोहिम राबवत ही कारवाई केली.
कृष्णा ढाबा हल्ल्यातील संशयितांकडून मिळाली माहिती-
तीन एके-५६ बंदुका, चिनी बनावटीचे दोन पिस्तूलासह मोठा शस्त्रसाठा सुरक्षा दलांनी जप्त केला. कृष्णा ढाबा हल्ल्यातील संशयितांना अटक केल्यानंतर पोलिसांनी माहिती मिळाली होती. जगभरातील राजदूत आणि प्रतिनिधींचे पथक बुधवारी काश्मीर दौऱ्यावर आले होते. तेव्हा काही दहशतवाद्यांनी प्रसिद्ध कृष्णा ढाब्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ढाब्याचा मालक जखमी झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली.
महिन्याच्या सुरुवातीलाही मोठी कारवाई
या महिन्याच्या सुरुवातीला सुरक्षा दलांनी राजौरी जिल्ह्यातील बुधाल भागातील खेत चाका येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला होता. काश्मिर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने कारवाई करत शस्त्रसाठा जप्त केला होता. ५ ग्रेनेड लॉन्चर, ए. के असॉल्ट रायफल, ९४ राऊंन्डस, दोन पिस्तूल कारवाईत पोलिसांनी जप्त केले. डोंगराळ भागात दगडाच्या कपारीत शस्त्रे लपवून ठेवण्यात आली होती.