चंदीगड Terrorist Gurpatwant Singh Pannu:पंजाबमधील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकानं शनिवारी बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टिस (एसएफजे) चा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू, खलिस्तानी नेता हरदीप सिंग निज्जर यांच्या विरोधात मोठी करावाई केलीय. ही कारवाई चंदीगड आणि जालंधर जिल्ह्यात करण्यात आलीय. एनआयएनं पन्नूच्या दोन मालमत्ताही जप्त केल्या आहेत. तसंच त्यांच्या निवासस्थानाबाहेर मालमत्ता जप्तीची नोटीस चिकटवण्यात आली. एनआयए मोहाली न्यायालयाच्या आदेशानुसार एका पथकानं शनिवारी ही कारवाई केली.
"आम्ही पंजाबमधील अमृतसर, चंदीगडमध्ये पन्नूच्या दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत," एजन्सीने जप्त केलेल्या पन्नूच्या मालमत्तेमध्ये अमृतसर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खानकोट या त्याच्या वडिलोपार्जित गावातील 46 कनाल कृषी मालमत्तेचा समावेश आहे. चंदीगडमधील सेक्टर 15 भागातील त्याची निवासी मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. पन्नू याच्या मालमत्तेबाहेर दहशतवादविरोधी तपास कारवाईची माहिती देणारे होर्डिंगही लावण्यात आले आहे."- एनआयए
मालमत्तेची जप्ती :बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. नोटीसमध्ये म्हटलं आहे की, घर क्रमांक 2033, सेक्टर 15-सी, चंदीगडचा एक चतुर्थांश भाग एनआयए प्रकरणातील घोषित गुन्हेगार गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या मालकीचा आहे. ज्याला एनआयए, एसएएसच्या विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार अटक करण्यात आली आहे. या मालमत्तेची जप्ती प्रतिबंध कायदा, 1967 च्या कलम 33 (5) अंतर्गत करण्यात आली आहे.