जम्मू-काश्मीर :उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ एका दहशतवाद्याला ठार करून घुसखोरीचा प्रयत्न जम्मू काश्मीर पोलिसांनी हाणून पाडला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, लष्कर आणि कुपवाडा पोलिसांनी नियंत्रण रेषेजवळील तंगधारच्या अमरोही भागात संयुक्तपणे कारवाई सुरू केली होती. पोलिसांनी सांगितले की, कारवाईदरम्यान एक दहशतवादी मारला गेला आणि त्यांचा घुसखोरीचा प्रयत्न फसला.
घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला : लष्कर आणि कुपवाडा पोलिसांनी हे संयुक्त ऑपरेशन राबविले. यामध्ये तंगधार सेक्टरच्या अमरोही भागात एलओसीवर दहशतवाद्याला कंठस्नान घालून त्यांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. अद्याप शोध मोहीम सुरू आहे. असे पोलिसांनी ट्विट केले. जम्मू-काश्मीरमध्ये नेहमीच अशा घटना होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
सुरक्षा दलांवर गोळीबार :जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील बरियामा भागात दहशतवादी लपल्याची माहिती गुप्त सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी बरियामा परिसरात नाकाबंदी करून शोध मोहीम राबवली. सुरक्षा दलाच्या प्रगतीदरम्यान तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. यादरम्यान दोन्ही बाजूंच्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. या भागात किती दहशतवादी आहेत, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम तीव्र :याआधी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथील खवास भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद झाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम तीव्र केली आहे. दहशतवाद्यांचा सुगावा शोधण्यासाठी गुप्तचर विभागही सक्रिय झाला होता. संशयित भागात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात आली. गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये घट झाली आहे. मात्र, केंद्रशासित प्रदेशात अजूनही तुरळक घटना समोर येत आहेत.
हेही वाचा :
- Terrorists killed in Poonch: सुरक्षा दलाकडून मोठी कामगिरी! चार दहशतवाद्यांचा खात्मा
- Kulgam Encounter : भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, सर्च ऑपरेशन सुरू
- Terrorists killed in Jammu Kashmir: घुसखोरीच्या प्रयत्न सुरक्षा दलाने हाणून पाडला, कारवाईत चार दहशतवादी ठार