जम्मू-काश्मीर - श्रीनगरमध्ये (Shrinagar) एका पोलीस बसवर दहशतवाद्यांनी हल्ला (Terrorists attack Police Bus) केला आहे. या हल्ल्यामध्ये दोन जवान शहीद झाले असून, 12 पोलीस जखमी (Jammu and Kashmir police injured) झाले आहेत. यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. हा दहशतवादी हल्ला जम्मू-काश्मीरमधील झेवान भागात झाला. या हल्ल्यामध्ये किती दहशतवादी होते आणि कसा हल्ला करण्यात आला, याबाबत तपास सुरू आहे.
श्रीनगरमध्ये पोलीस बसवर दहशतवादी हल्ला - पंतप्रधानांनी मागवता तपशील -
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा तपशील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मागवला आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा जवानांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदनाही व्यक्त केल्या आहेत.
- नवव्या बटालियनच्या बसवर हल्ला -
श्रीनगरमध्ये सशस्त्र दलाच्या नवव्या बटालियनच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात अनेक पोलीस जखमी झाले आहेत. त्यातील 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसवर हल्ला केला. या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर टायगर्स या संघटनेने घेतली आहे. ही संघटना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी जोडली असल्याची माहिती समोर येत आहे.
श्रीनगरच्या पंथचौक परिसरात पोलिसांच्या बसवर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. मात्र, लगेच या परिसरातून दहशतवादी पळून गेले आहेत. या हल्ल्यात 2 पोलीस शहीद झाले असून 12 पोलीस जखमी झाले आहेत. या सर्व जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
- रंगरेथ परिसरात दोन दहशतवादी ठार -
श्रीनगरच्या रंगरेथ परिसरात आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले होते. रंगरेथमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने या परिसरात सर्च ऑपरेशन केले.