भीलवाडा -नुकतेच दोन तरुणांना मारहाण करून दुचाकी जाळल्याची घटना घडल्याने (Tension In Bhilwara) शहरात तणावाचे वातावरण होते. पुन्हा एकदा अशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा चाकूने वार करून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ( Communal Tension In Bhilwara ) प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
त्याचवेळी आज काही संघटनांनी भिलवाडा बंदची घोषणा केली आहे. बुधवार 11 मे रोजी सकाळी 6.00 ते गुरुवार 12 मे रोजी सकाळी 6:00 वाजेपर्यंत भिलवाडा शहरातील नेट 24 तास बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. तरुणाच्या हत्येची माहिती मिळताच सर्व संघटनांचे नेते जिल्हा रुग्णालयात जमा झाले. यामध्ये भिलवाडा शहराचे आमदार विठ्ठल शंकर अवस्थी, भाजपचे जिल्हाध्यक्ष लाडू लाल तेली, नगर परिषदेचे अध्यक्ष राकेश पाठक यांचा समावेश होता.
भिलवाडा येथील तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाचही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एसटीएफ आणि आरएसीचे जवान तैनात करण्यात आले होते. मृत तरुणाचे मामा महेश खोतानी यांनी न्यायाची मागणी करत सर्व हल्लेखोरांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचे सांगितले. विविध संघटनांनीही या हत्येचा निषेध करत जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरले आहे.