श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील किश्वाड जिल्ह्यात सिंथान दरीजवळ पोलीस आणि सैन्याच्या पथकाने बर्फात अडकलेल्या 10 लोकांना वाचवले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. रविवारी रात्रीपासून मुसळधार हिमवृष्टीमुळे सात पुरुष, दोन महिला आणि एक मूल या भागात अडकल्याचे सैन्याने सांगितले.
गेल्या दोन दिवसांत केंद्रशासित प्रदेशातील अनेक उंच भागात जोरदार हिमवृष्टी झाली. तर, सखल भागात पाऊस पडला. यामुळे तापमान बर्यापैकी खाली आले आहे. लवकरच हवामान स्वच्छ होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
हेही वाचा -सातपुडा व्याघ्र प्रकल्पात टूरिस्ट बससमोर तीन बछड्यांसह वाघिणीचे दर्शन
जम्मू-काश्मीरमधील या 4 जिल्ह्यांत हिमस्खलनाचा इशारा
जम्मू-काश्मीरच्या 4 जिल्ह्यांत हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रशासित प्रदेशात सोमवारी ताजी बर्फवृष्टी झाल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे.
पुढील 48 तासांत कुपवाडा व बारामुल्ला जिल्ह्यांत मध्यमस्तरीय हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बांदीपोरा आणि गॅंदरबलसाठी कमी प्रमाणात हिमस्खलनाचा इशारा आहे. जेव्हा उंच भागातील हवामान स्वच्छ होते, तेव्हा हिमस्खलन होण्याचा धोका जास्त असतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोन दिवस पाऊस आणि बर्फवृष्टी झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील हवामानात सुधारणा झाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस/बर्फवृष्टी वगळता येत्या 7 दिवसांत सामान्य हवामान परिस्थितीत कोणताही मोठा बदल होणार नाही, असे हवामान अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा -जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षातील पहिला हिमवर्षाव; पर्यटकांनी लुटला मनमुराद आनंद