अमरावती : तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रेड्डी हे रामोजी ग्रुपचे चेअरमन रामोजी राव यांना टार्गेट करत असल्याचा आरोप नायडू यांनी लावला आहे. 'मार्गदर्शी' चिटफंड कंपनी तेलुगु नागरिकांना अनेक वर्ष सेवा देत आहे. त्यामुळे तेलुगु व्यक्ती हे रामोजी राव यांच्यासोबत असल्याचे नायडू म्हणाले.(Telugu People With Ramoji Rao)
नायडू यांची पोस्ट -चंद्राबाबू नायडू यांनी एक्स अर्थात ट्विटरवर एक पोस्ट शेयर केली आहे. नायडू यांनी लिहिले की, संस्था नष्ट करण्याचा जगनमोहन रेड्डी यांचा ट्रेंड सुरू आहे. तसेच रेड्डी हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला 'मीडिया' नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत . आपल्या अपयशामुळे आलेली निराशा आणि लोकांमधील प्रचंड नाराजी यामुळे (रेड्डी) ते 'मार्गदर्शी'सारख्या जुन्या संस्थांना लक्ष्य करत आहेत. 'मार्गदर्शी'ने मागील साठ वर्षांपासून तेलुगु लोकांची कर्तव्यभावनेने सेवा केली आहे.
रेड्डींवर गंभीर आरोप -नायडू पुढे लिहितात की, रामोजी राव यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. पत्रकारिता, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे रामोजी राव यांना देशाचा नागरी सन्मान 'पद्मविभूषण'ने गौरविण्यात आले. रामोजी राव हे सचोटी, मूल्ये आणि तत्त्वांना वाहिलेले व्यक्ती आहे. त्यामुळे 'वायएसआरसीपी'कडून त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.
जनता रामोजी रावांसोबत -जगनमोहन रेड्डी हे हुकूमशहाप्रमाणे वागत आहेत. रेड्डी आणि 'वायएसआरसीपी'चे घोटाळे उघड करणार्या 'ईनाडू' आणि 'ईटीव्ही'सारख्या माध्यमांना ते जाणूनबुजून त्रास देत आहेत. या सर्व प्रकाराचा मी निषेध करतो, असे चंद्राबाबू नायडू यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते 'पद्मविभूषण' पुरस्कार स्विकारतानाचा रामोजी राव यांचा एक फोटो नायडू यांनी सोशल मीडियावर शेयर केला आहे.
हेही वाचा -Ramoji Film City : रामोजी फिल्म सिटीच्या तुऱ्यात आणखी एक मोरपीस, उत्कृष्ट पर्यटन प्रोत्साहनाचा पुरस्कार प्रदान