हैदराबाद : बीआरएस नेते आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल इरवली येथील राहत्या घरी पडून ते जखमी झाले. त्यामुळे केसीआर यांना गुरुवारी मध्यरात्री सोमाजीगुडा यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचे माकड हाड मोडल्याचं डॉक्टरांना आढळले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. मात्र, वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेणार आहे. सध्या केसीआर यांची प्रकृती स्थिर आहे.
मुलीने ट्विट करून दिली माहिती : केसीआर यांच्या मुलीनं एक्स सोशल मीडियावर पोस्ट करत केसीआर घसरून पडल्याची माहिती दिली आहे. केसीआर यांची मुलगी के कविता यांनी त्यांच्या एक्स-पोस्टमध्ये म्हटले आहे, की "बीआरएस सुप्रीमो केसीआर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. ते सध्या रुग्णालयात तज्ञांच्या देखरेखीखाली आहेत. पाठिंबा आणि शुभेच्छांमुळे माझे वडील लवकरच बरे होतील. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद."
मुख्यमंत्री बनण्याची हॅटट्रिक हुकली :तेलंगणातील विधानसभा निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर झाले. यामध्ये केसीआर यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तेलंगणात काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं. त्यामुळे केसीआर यांची मुख्यमंत्री बनण्याची हॅटट्रिक हुकली. 2013 मध्ये तेलंगणा राज्याच्या स्थापनेपासून ते सत्तेवर होते. या निवडणुकीत काँग्रेसने 64 जागा बीआरएसने 39 जागा जिंकल्या. भाजपने 8 जागा जिंकल्या आहेत. तर इतरांनीही 8 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी उपस्थित होते. रेवंत हे काँग्रेसचे तेलंगणा प्रदेशाध्यक्षही आहेत. त्यांच्यासोबत आणखी 10 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.