हैदराबाद Telangana Election 2023 : तेलंगाणात विधानसभेच्या 119 जागांसाठी मतदान झालं. राज्यभरात प्रशासनानं मतदानासाठी जय्यत तयारी केली होती. हैदराबाद शहरातीलही विविध मतदान बुथवर प्रशासनाकडून चांगली तयारी करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस दलानं कडेकोड बंदोबस्त तैनात केला होता.
गुरुवारी सकाळीच 'पुष्पाभाई' म्हणजे सगळ्यांचा लाडका अभिनेता अल्लू अर्जुन यानं ज्युबली हिल मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदान केलं. यावेळी अल्लू अर्जुन यानं रांगेत उभं राहून मतदारांशी संवाद साधला. तसेच राज्यातील दिग्गज सेलिब्रिटी, राजकारणी, प्रतिष्ठित नागरिक यांनी मतदानाचा हक्क बजावला.
'या' दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क : तेलंगाणा विधानसभा निवडणुकीत दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात सुप्रसिद्ध अभिनेते व्यंकटेश दुग्गुबती यांनी रंगारेड्डीतील प्रेसिडेन्सी पदवी महाविद्यालयात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता श्रीकांत यांनी ज्युबली हिल्स परिसरातील मतदान केंद्रावर मतदान केलं. सुप्रसिद्ध माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 'तुम्ही मतदान केलं नाही, तर तुम्हाला सरकारविरोधात बोलण्याचा अधिकार राहत नाही, त्यामुळे आपला मतदानाचा हक्क बजावा', असं आवाहन मोहम्मद अझरुद्दीन यांनी केलं.
दोन गटात राडा झाल्यानं तणाव : जानगाव इथल्या मतदार संघात भारत राष्ट्र समिती, भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यामुळे परिसरता तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं पुढील अनर्थ टळला. त्यामुळं जानगाव मतदार केंद्रावर तणावपूर्ण शांतता होती.
'पुष्पाभाई' मतदानासाठी रांगेत, चाहत्यांशी साधला संवाद : मतदानासाठी अनेक दिग्गज सकाळीच घराबाहेर पडले होते. स्टायलीश स्टार आणि सगळ्यांचा लाडका अभिनेता अल्लू अर्जुन अर्थात पुष्पाभाई सकाळीच ज्युबली हिल्स परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर दाखल झाला होता. मतदान रांगेत चक्क पुष्पाभाईला पाहून त्याचे चाहतेही सुखावून गेले. यावेळी अल्लू अर्जुन यानंही मतदान रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांशी संवाद साधला.