नवी दिल्ली -सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितल्याप्रकरणी काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबद्दल आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सध्या राजकारण तापलेलं आहे. यातच राहुल गांधींना पाठिंबा दर्शवत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ( K Chandrashekhar Rao questions surgical strike b ) सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत पुरावे मागितले. तसेच यावेळी त्यांनी 'देशात लोकशाही असून तुम्ही सम्राट किंवा एखादे राजे नाही आहात', असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. तसेच सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे सादर करणे ही सरकारची नैतिक जबबादारी असल्याचेही त्यांनी म्हटलं.
पुलवामा हल्ल्याला आज तीन वर्ष पूर्ण होत आहे. यातच आज के चंद्रशेखर राव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागणे चुकीचे नसल्याचे म्हटलं. तसेच त्यांनीदेखील सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले. यासोबतच त्यांनी भाजपावर खोटा अजेंडा पसरवल्याचा आरोपही केला. लोकशाहीत तुम्ही राजा किंवा सम्राट नसता, असे राव पुढे म्हणाले.
काय प्रकरण?
पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी सर्जीकल स्ट्राईकचे पुरावे मागितले होते. यावरून भाजपा नेत्यांनी वेळोवेळी राहुल गांधीला लक्ष्य केले आहे. सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागण्याच्या मुद्द्यावरून हेमंत बिस्वा सरमांनी उत्तराखंडमधील प्रचारसभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा उल्लेख करत राहुल गांधींना निशाणा बनवलं. 'भारतानं पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केलं. राहुल गांधींनी काय विचारलं, पुरावे मागितले. पण, आम्ही कधी राहुल गांधींचे वडील खरंच राजीव गांधींच आहेत का, याचे पुरावे मागितले का, असा प्रश्न सरमा यांनी विचारला. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. हेमंत बिस्वा सरमांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
हेमंत बिस्वा यांच्या निषेधार्थ भारतीय युवक काँग्रेसने शनिवारी आसाम भवनाबाहेर आंदोलन केले. तसेच काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी हेमंता बिस्वा शर्मा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. मानसिक संतुलनातून असली बेताल वक्तव्य केली जात आहेत. त्यांच्या वक्तव्यातून हेमंत बिस्वा शर्मा यांची घाणेरडी विचारसरणीच दिसून येते असे सुरजेवालांनी म्हटलं. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही भाजपावर टीका केली आहे. भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचे असभ्य विधान आहे. त्यांचे वक्तव्य हे भाजपाच्या स्त्रीविरोधी विचारसरणीचे प्रतीक आहे. हा प्रत्येक आईचा अपमान आहे. हे दुर्दैवी! अत्यंत निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -Hemanta Sarma vs Rahul Gandhi : असे काय म्हणाले हेमंत बिस्वा शर्मा? ज्यामुळे राजकारण तापलं, काँग्रेस आक्रमक