महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Telangana Assembly Election : YSRTP ची तेलंगणा विधानसभा निवडणुकीतून माघार, कॉंग्रेसला पाठिंबा

Telangana Assembly Election : वायएसआर तेलंगणा पार्टी (YSRTP) आगामी तेलंगणा विधानसभा निवडणूक लढवणार नाही. ते काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणार आहेत. वाचा सविस्तर बातमी.

Telangana Assembly Election
Telangana Assembly Election

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 4:33 PM IST

हैदराबाद (तेलंगणा) Telangana Assembly Election : वायएसआर तेलंगणा पार्टी (YSRTP) या वर्षीची तेलंगणा विधानसभा निवडणूक लढवणार नाही. पक्षाच्या अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी यांनी शुक्रवारी जाहीर केलं. त्यांचा पक्ष या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पाठिंबा देणार आहे.

निवडणूक का लढवणार नाही : हैदराबाद येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना शर्मिला म्हणाल्या की, त्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहेत. तेलंगणात ३० नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगानं अधिसूचना आणि वेळापत्रक जाहीर केलं. त्याच दिवशी शर्मिला यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आपण हा निर्णय का घेतला याचं स्पष्टीकरण देताना वायएस शर्मिला म्हणाल्या की, 'काँग्रेसला ही निवडणूक जिंकण्याची संधी आहे. सरकार बदलण्याची संधी असताना त्यात अडथळे निर्माण करणं योग्य नाही. केसीआर यांच्या भ्रष्ट राजवटीला हटवण्याच्या प्रयत्नात त्यांचा पक्ष काँग्रेसला पाठिंबा देईल', असं त्यांनी स्पष्ट केलं.

विरोधी मतांची फूट रोखण्याचा प्रयत्न : सत्ताविरोधी मतांची फूट रोखण्यासाठी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं शर्मिला यांनी सांगितलं. विरोधी मतांची फूट झाली तर त्याचा फायदा केसीआर यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीला (BRS) होईल, असंही त्या म्हणाल्या. पक्षानं केलेल्या काही सर्वेक्षणांचा संदर्भ देत शर्मिला म्हणाल्या की, या निवडणुकीतील त्यांचा सहभाग काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयावर थेट परिणाम करेल. त्यामुळेच वायएसआरटीपीनं यावेळी निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज : वायएस शर्मिला पुढे म्हणाल्या की, गेल्या साडेनऊ वर्षांत एका कुटुंबाच्या लोभ आणि अत्याचारामुळे तेलंगणासारखं श्रीमंत राज्य कर्ज आणि समस्यांच्या गर्तेत अडकलं. राज्यातील बीआरएसला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी सर्व प्रतिस्पर्धी पक्षांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

तेलुगु देसम पार्टीही निवडणूक लढवणार नाही : ११९ सदस्यांच्या तेलंगणा विधानसभेसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्ताधारी बीआरएसला कडवं आव्हान देत आहे. याशिवाय भाजपा देखील राज्यातील आपलं मताधिक्य वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. तेलुगु देसम पार्टी (TDP) यांनी या आधीच ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा :

  1. Chandrababu Naidu : चंद्रबाबू नायडूंची तुरुंगातून सुटका, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

ABOUT THE AUTHOR

...view details