दिब्रुगड : अमृतपालच्या वडिलांसह १० जणांचे पथक पंजाबमधून दिब्रुगडमध्ये दाखल झाले आहे. खलिस्तानी नेता अमृतपाल सिंगला त्याचे कुटुंबिया आज आसाममधील दिब्रुगड तुरुंगात भेटणार आहेत. अमृतपाल सिंगसोबत आणि काही साथिदारही या कारागृहात बंदिस्त आहेत. त्यांच्या कुटूंबियांचीही आरोपींसोबत भेट होणार आहे. त्यामुळे 10 जणांचे हे पथक दिब्रुगडमध्ये दाखल झाले आहे.
शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समिती सदस्यही सोबत :अमृतपाल सिंग यांच्यासह १० बंदीवानांचे नातेवाईक आज त्यांना भेटण्यासाठी दिब्रुगड विमानतळावर दाखल झाले आहेत. पंजाबमधून 10 जणांचे पथक आले आहे. या पथकात शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे दोन सदस्यांचाही सहभाग आहे. त्याच्यासह अमृतपाल आणि त्याच्या साथिदारांच्या कुटुंबातील आठ जणांचा या पथकात समावेश आहे. अमृतपाल सिंगचे वडील आणि त्याच्या इतर नातेवाईकही आज अमृतपाल सिंगसह त्याच्या साथिदारांना भेटणार आहेत.
दिब्रुगड कारागृहात तगडा बंदोबस्त :कुख्यात खलिस्तानवादी अमृतपाल सिंगला भेटण्यासाठी त्याचे नातेवाईक शहरात येत असल्याने कारागृहासह शहरात तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कारागृहाजवळ कोणत्याही प्रवासी वाहनांना पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. शहरातील कारागृह परिसराला पोलीस छावणीचे रुप आले आहे. त्यामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था किती कडक करण्यात आली आहे, त्याची प्रचिती येते.
पोलिसांनी आवळल्या होत्या मुसक्या : पंजाब पोलिसांनी तब्बल 36 दिवस अमृतपाल सिंगचा पाठलाग करुन त्याच्या 23 एप्रिलला मुसक्या आवळल्या होत्या. अमृतपालला पंजाब पोलिसांनी मोगा या भिंद्रनवालेच्या गावातून अटक केली होती. पंजाब पोलिसांना अमृतपाल मोगा गावातील गुरुद्वारात आढळून आला होता. मात्र अमृतपाल सिंगच्या आईने अमृतपालने आत्मसर्पण केल्याचा दावा केला होता. अमृतपाल सिंग पोलिसांच्या हाती लागला नाही, तर त्याने पोलिसांपुढे आत्मसर्पण केल्याचा दावा त्याच्या आईने केला होता. अमृतपाल सिंग 18 मार्चपासून फरार असून त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा - Thackeray Group Vs BJP : दंगली हाच भाजपच्या राजकारणाचा आधार- सामनातून भाजपवर टीका