हापूर - जिल्ह्यातील धौलाना तालुक्यातील ( Dhaulana Tehsil of Hapur ) एका गावातील प्राथमिक शाळेत ( primary school ) एक लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. प्राथमिक शाळेतील दोन शिक्षकांवर दोन विद्यार्थिनींनी जबरदस्तीने गणवेश काढल्याचा आरोप केला आहे. मुलीच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे की, नऊ वर्षांची मुलगी आणि तिच्या भावाची आठ वर्षांची मुलगी प्राथमिक शाळेत शिकतात. शाळेत दोन शिक्षकांनी दोन्ही विद्यार्थिनींना ड्रेस काढून इतर विद्यार्थिनींना देण्यास सांगितले. दुसऱ्या मुलींना हा गणवेश देऊन त्यांचेही गणवेशातील फोटो काढता येतील, असे या शिक्षकांचे म्हणणे होते.
मुलींचा नकार - दोन्ही मुलींनी ड्रेस काढण्यास नकार दिल्यावर शिक्षकांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तसेच दोघींना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. यानंतर जबरदस्तीने दोन्ही विद्यार्थिनींचे ड्रेस काढून इतर विद्यार्थिनींना दिले. पीडितेच्या वडिलांनी आरोप केला आहे की, इतर मुलींनी त्यांच्या मुलींचा ड्रेस घालून फोटो काढले आहेत. दोन्ही शिक्षकांनी विद्यार्थिनींना हे घरी सांगण्यास मनाई केली आणि धमकावले.