महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शिक्कामोर्तब! AIR INDIA वर TATA चीच मालकी!

अनेक शक्यतांच्या पार्श्वभूमीवर अखेर एअर इंडियाची मालकी टाटांकडेच येणार यावर शुक्रवारी अधिकृत शिक्कामोर्तब झाले. टाटा सन्सने एअर इंडियाच्या खरेदीसंदर्भातील बोली जिंकली असून आता एअर इंडिया ही पुन्हा एकदा टाटांकडे आल्याचे दिसून येत आहे.

By

Published : Oct 8, 2021, 4:26 PM IST

Updated : Oct 8, 2021, 5:47 PM IST

शिक्कामोर्तब! AIR INDIA वर TATA चीच मालकी!
शिक्कामोर्तब! AIR INDIA वर TATA चीच मालकी!

नवी दिल्ली : होणार, नाही होणार अशा अनेक शक्यतांच्या पार्श्वभूमीवर अखेर एअर इंडियाची मालकी टाटांकडेच येणार यावर शुक्रवारी अधिकृत शिक्कामोर्तब झाले. टाटा सन्सने एअर इंडियाच्या खरेदीसंदर्भातील बोली जिंकली असून आता एअर इंडिया ही पुन्हा एकदा टाटांकडे आल्याचे दिसून येत आहे. तब्बल 18 हजार कोटींमध्ये टाटा सन्सने एअर इंडियाची खरेदी केली आहे.

18 हजार कोटींची बोली

टाटा सन्सची टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने लिलावात 18 हजार कोटींच्या किंमतीसह बोली जिंकल्याची माहिती गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी दिली. डिसेंबर 2021 पर्यंत हा व्यवहार पूर्णत्वास येण्याची अपेक्षा आहे.

टाटांकडे येईल 15300 कोटींचे कर्ज

31 ऑगस्ट 2021 मधील आकडेवारीनुसार एअर इंडियावर 61562 कोटींचे कर्ज आहे. यशस्वी बोली लावणाऱ्याला 15300 कोटींचे कर्ज दिले जाईल, त्यानंतर 46262 कोटींचे कर्ज कायम राहिल. सरकारने 2009-10 पासून एअर इंडियाला 54584 कोटींचे रोख तर 55692 कोटींचे गॅरंटी सहकार्य केले आहे. हे एकत्रित सहकार्य 110276 कोटी इतके असल्याचे पांडे म्हणाले.

कर्मचाऱ्यांना नोकरीची हमी

बोली विजेत्यास एक वर्षासाठी सर्व कर्मचाऱ्यांना कायम ठेवावे लागेल. जर एक वर्षानंतर त्यांना कायम ठेवले नाही तर त्यांना बोली विजेत्याकडून व्हिआरएस दिला जाऊ शकेल असे नागरी उड्डयन सचिव राजीव बन्सल यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून एअर इंडियाचे खासगीकरण करून विकण्याचा विचार केंद्र सरकारकडून केला जात होता. यापूर्वी केंद्र सरकारने एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा ग्रुप आणि स्पाइसजेट संस्थापकाच्या आर्थिक बोलींचे मूल्यांकन सुरू केले होते.

एअर इंडियाचा प्रवास

  • 1932 मध्ये दोन लाखांची गुंतवणूक करून टाटा एअरलाईन्सची सुरूवात करण्यात आली होती.
  • ऑक्टोबर 1932 मध्ये कराची ते बॉम्बेदरम्यान टाटा एअरलाईन्सच्या पहिल्या विमानाचे उड्डाण झाले होते.
  • 1946 मध्ये टाटा एअरलाईन्सचे एअर इंडिया असे नामकरण
  • 1953 मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण
  • ऑक्टोबर 2021 मध्ये टाटा सन्सने एअर इंडियाची खरेदी केली

यापूर्वी झाले होते वृत्ताचे खंडन

टाटा सन्सने एअर इंडियाच्या खरेदीची बोली जिंकल्याचे वृत्त यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजीही समोर आले होते. मात्र तेव्हा केंद्र सरकारकडून याविषयी अद्याप काहीही निर्णय झाला नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. तर टाटा ग्रुपकडून मात्र यावर काहीही मत व्यक्त करण्यात आले नव्हते. तरीही टाटा ग्रुपकडे एअर इंडियाची मालकी आल्याची चर्चा सगळीकडे तेव्हापासूनच सुरू होती. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना अनेक वर्षांनंतर वेळेत पगार मिळाल्याचेही वृत्त गेल्या काही दिवसांपासून फिरत होते. हा टाटा इफेक्ट असल्याचीच चर्चा सुरू होती. अखेर शुक्रवारी 8 तारखेला या खरेदीच्या वृत्तावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे एअर इंडिया आता पुन्हा टाटा ग्रुपकडे आली आहे.

नाव बदलणार?

एअर इंडियाची टाटा सन्सकडे मालकी आल्याने आता एअरलाईन्सचे नाव बदलणार की एअर इंडियाच राहणर अशीही नवी चर्चा सुरू झाली आहे. एअर इंडिया अशा नामकरणापूर्वी कंपनीचे टाटा एअरलाईन्स असे नाव होते. त्यामुळे टाटा ग्रुपकडून एअर इंडियाचे नाव बदलले जाणार की हेच नाव कायम ठेवले जाणार याकडेही आता सर्वांचे लक्ष असेल.

हेही वाचा -अखेर एअर इंडियाचा लिलाव, टाटा ग्रुप बनला नवा मालक

Last Updated : Oct 8, 2021, 5:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details