चेन्नई Tamil Nadu Rains : तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालंय. तामिळनाडूतील चार जिल्हे अतिवृष्टी आणि पूरसदृश परिस्थितीमुळं सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. तिरुनेलवेली, तुतीकोरीन, तेनकासी आणि कन्याकुमारी या चार जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवलाय. तुतीकोरीन जिल्ह्यातील तिरुचेंदूर इथं पहाटे दीड वाजेपर्यंत अवघ्या 15 तासांत 60 सेंटीमीटर पाऊस झाला. तर तिरुनेलवेली जिल्ह्यातील पलायमकोट्टई इथं 26 सेमी पावसाची नोंद झाली आहे. कन्याकुमारीत 17.3 सेमी पाऊस झालाय.
आज सार्वजनिक सुट्टी जाहीर : मुसळधार पावसामुळं बाधित जिल्ह्यांमध्ये आज सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीय. या काळात शाळा, महाविद्यालये, बँका, खासगी आस्थापना आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या देखील बंद राहतील. केवळ मुसळधार पाऊसच नाही तर धरणातून सोडण्यात आलेलं पाणीही लोकांसाठी अडचणीचं ठरलंय. पापनासम, पेरुंजानी आणि पेचुपराई धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि कन्याकुमारी जिल्ह्यातील अनेक भागात गुडघाभर पाणी साचलं आहे.
आजही मुसळधार पाऊस : मुसळधार पावसामुळं तेलंगणातील थामरापारणी नदीला पूर आलाय. त्यामुळंच धरणातील पाण्याचं योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान विभागानं आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. कोमोरिन परिसरात चक्रीवादळ निर्माण झाल्यानं परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. काही दिवसांपूर्वीच मिचॉन्ग चक्रीवादळ तामिळनाडूला धडकलं होतं. त्यामुळं राज्यात मोठं नुकसान झालं होतं.