लखनऊ -उत्तर प्रदेशचे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी पुन्हा एकदा बोलताना अकलेचे तारे तोडले आहेत. ताजमहल हे पूर्वी शिवमंदिर होते. त्यामुळे लवकरच ताजमहलाचे नाव बदलून राममहल असे ठेवण्यात येईल, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नाथ यांचा उल्लेख त्यांनी शिवाजी असा केला. उत्तर प्रदेशात शिवाजीचे वंशज म्हणून आदित्यनाथ आले आहेत, असे ते म्हणाले.
मुस्लीम राज्यकर्ते व आक्रमणकर्त्यांनी भारताची संस्कृती नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल. पण आता ती पूर्ववत करण्यासाठी सुवर्णकाळ आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे शिवाजी महाराजांच्या कुळातील आहेत. आणि ते नक्कीच ताजमहालचे नाव बदलतील, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी बंगाल विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. बंगाल वाचवायचा असेल तर बंगालच्या लोकांना ममतांचा त्याग करावा लागेल. कारण ममता बॅनर्जी राक्षस आहेत. लोकांच्या सहानुभूतीसाठी त्या जखमी असल्याचे नाटक करत आहेत, असे सिंह म्हणाले.