लखनऊ Sanjay Singh Threat To Kill : भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुकीवरुन सुरू असलेलं राजकारण अद्याप संपलं नाही. त्यातच आता भारतीय कुस्ती संघटनेचे निलंबित अध्यक्ष संजय सिंह यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. या संदर्भात संजय सिंह यांनी वाराणसीतील भेलुपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस धमकी देणाऱ्या फोन क्रमांकाचा तपास करत आहेत.
संजय सिंह यांना फोनवरुन धमकी :भारतीय कुस्ती संघटनेचे निलंबित अध्यक्ष संजय सिंह यांना अज्ञान फोन नंबरवरुन जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. संजय सिंह यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या मोबाईलवर शिवीगाळ केली. यावेळी संजय सिंह यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 12 जानेवारीला रात्री 08.30 आणि 9.35 च्या दरम्यान संजय सिंह यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून कॉल आला. यावेळी अनोळखी नंबर असल्यानं संजय सिंह यांनी फोन उचलला नाही.
ब्रिजभूषण सिंहला केली शिवीगाळ :या व्यक्तीनं संजय सिंह यांना 13 जानेवारीला पुन्हा दुपारी 12.17 वाजता त्याच नंबरवरून फोन केला. यावेळी संजय सिंह यांनी "मी अज्ञात नंबरवरुन आलेला फोन उचलला. मात्र कॉलरनं शिवीगाळ करुन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यानंतर फोन कट झाला. पुन्हा त्याच फोन नंबरवरून 2.42 आणि 2.48 वाजता फोन आला. यावेळी त्यानं भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यासह मला शिवीगाळ केली. त्यानंतर कॉलरनं घाबरून फोन कट केला. फोन कट झाल्यानंतर त्या नंबरवरून सतत कॉल येत असल्यानं माझं कुटुंब खूप घाबरलं आहे." या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या वतीनं देण्यात आली आहे.
हेही वाचा :
- कुस्ती परिषदेचा 'आखाडा': निलंबन मान्य नाही, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा घेणार; संजय सिंह यांचं सरकारला आव्हान
- संजय सिंहांची WFI अध्यक्षपदी निवड होताच कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा; पत्रकार परिषदेत बोलताना अश्रू अनावर
- Wrestler Protest : तर भारतीय कुस्ती परिषद निलंबित करू, कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीची जागतिक कुस्ती संघटनेकडून दखल