नवी दिल्ली -निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी आज मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोरा यांचा कार्यकाळ सोमवारी संपला. घटनेच्या कलम 324 च्या कलम (दोन) नुसार राष्ट्रपतींनी श्री. सुशील चंद्रा यांची 13 एप्रिल, 2021 पासून मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
चंद्रा यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी 14 फेब्रुवारी 2019 रोजी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. सुशील चंद्रा हे 14 मे 2022 पर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळतील. चंद्रा यांच्या नेतृत्वात गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेशात निवडणूक विधानसभा निवडणुका पार पडतील. गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब विधानसभेची मुदत पुढील वर्षी वेगवेगळ्या तारखेला संपणार आहे.