नवी दिल्ली : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरुन सध्या देशभरात रणकंदन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी महिला असल्याने राष्ट्रपती दौर्पदी मुर्मू यांना नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यापासून डावलण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांनाच नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्याबाबत विरोधी पक्ष आग्रही आहेत. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून याचिकाकर्त्याला दणका दिला आहे.
काय आहे याचिकेचे प्रकरण :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालात नवीन संसदेचे बांधकाम करण्यात आले आहे. या नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन 28 मे रोजी करण्यात येणार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या इमारतीच्या उद्घाटनाला विरोध करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या इमारतीचे उद्घाटन करु नये, यासाठी विरोधकांनी मोट बांधली आहे.
तब्बल 19 पक्षांनी टाकला बहिष्कार :नवीन संसदेच्या इमारतीचे उद्घाटन 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मात्र देशातील तब्बल 19 पक्षांनी या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनीही या कार्यक्रमास जाणार नसल्याचे स्पष्ट करुन आक्रमक पवित्रा घेतला आहे.