नवी दिल्ली :गुजरातच्या 2002 मधील गोध्रा ट्रेन आग प्रकरणातील आठ दोषींना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. परंतु या खटल्यातील इतर चौघांना निर्दोष सोडण्यास न्यायालयाने नकार दिला. फेब्रुवारी 2002 मध्ये गुजरातमधील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्याला आग लागून 59 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्यात धार्मिक दंगली भडकल्या होत्या. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा यांना सांगितले की, 'या प्रकरणातील त्यांच्या भूमिकेमुळे चार आरोपींना जामीन मिळू शकत नाही'.
चार दोषींची याचिका फेटाळली : चार आरोपींच्या जामिनाला विरोध करताना मेहता म्हणाले की, त्यांच्यापैकी एकाकडून लोखंडी रॉड जप्त करण्यात आला आहे. तर इतर आरोपींकडून एक शस्त्र आणि विळा जप्त करण्यात आला आहे. मेहता म्हणाले की, आणखी एका आरोपीने पेट्रोल विकत घेतले होते, ज्याचा वापर कोचला आग लावण्यासाठी केला गेला. तर शेवटच्या आरोपीने प्रवाशांवर हल्ला केला आणि त्यांना लुटले. मेहता यांनी ज्यांच्या जामीनाला विरोध केला होता, त्या चारही दोषींच्या जामीन अर्जावर न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली पाहिजे आणि इतर दोषींना जामीन द्यावा, अशी सूचना ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांनी केली.
न्यायालयातील युक्तिवाद : हेगडे यांनी खंडपीठाला चार दोषींच्या जामीन याचिकांवर दोन आठवड्यांनंतर सुनावणी करण्याची विनंती केली. आणखी एका ज्येष्ठ वकिलानेही खंडपीठाला चार आरोपींचा जामीन अर्ज फेटाळू नये आणि त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली. मेहता यांनी चार दोषींच्या जामीन याचिका फेटाळल्या पाहिजेत असा आग्रह धरला होता.युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने आठ दोषींना जामीन मंजूर केला आणि चार दोषींना जामीन नाकारला.
उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान :गुजरात सरकारने 11 दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाला अशी माहिती देण्यात आली की, या प्रकरणातील अनेक आरोपींनी या खटल्यातील त्यांची शिक्षा कायम ठेवण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. गोध्रा ट्रेन जाळपोळीतील एका आरोपीला सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 15 डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला होता. या वर्षी जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अब्दुल रहमान धंतिया उर्फ कानकट्टो, अब्दुल सत्तार इब्राहिम गड्डी अस्ला आणि इतरांच्या जामीन याचिकेवर राज्य सरकारला नोटीस बजावली होती.
हेही वाचा :Firing in Delhi Court : वकिलाच्या वेशात आलेल्या आरोपीचा महिलेवर गोळीबार, महिलेवर उपचार सुरू